शहरातला बदाम आपल्या सर्वांच्या परिचयाचा. छत्रीसारख्या गोलाकार फांद्या आणि टोकाकडे गोल आणि देठाकडे निमुळती होत गेलेली मोठाली पानं. पण यापेक्षा आपण सगळ्यांनीच लहानपणी याची सुकलेली फळं फोडून आतली तेलकट कडसर बी खाल्लेली असणार. बहुतेकांना माहित असेल कि आपल्या सुक्या मेव्यातील बदाम आणि हे झाड यांचा काहीही संबंध नाही. आपण खातो त्या बदामाची झाडे भारतात थोड्याफार प्रमाणात काश्मीर किंवा हिमाचलच्या भागात लावलेली आहेत. हा बदाम पूर्णतः शहरी किंवा श्री. द. महाजन सर म्हणतात तसा खोटा बदाम. कारण हा मुळचा आहे ईस्ट इंडियन देशांमधील. आपल्याकडे रस्त्यांच्या कडेला किंवा सोसायटीच्या आवारात लावला गेलेला. परंतु आपल्या जंगलात न आढळणारा. विदेशी. या शहरी बदामाचं वैशिष्ट्य म्हणजे पानगळीच्या हंगामात याची पानं गळून पडताना लाल- किरमिजी रंगाची होतात. सध्या ठाणे शहरातील रस्त्यांवर तुम्हांला या बदामाचे फॉल कलर्स बघण्याची संधी आहे.
जिथे जिथे पिंपळ, पांढरी सावर फुललेली आहे, तिथे सकाळ संध्याकाळ वटवाघळांच्या वाऱ्या चालू आहेत. आंबा मोहरलाय. परंतु अजून कोकीळकुजानाला सुरुवात नाही झाली. बोरं पिकलीयेत. शहरातही कधी कधी अचानक एखाद्या बोरीच्या खाली टपोरी केशरी बोरं पडलेली मिळतात आणि मग अगदी मोह आवरत नाही. अगदी घसा बिघडेपर्यंत आंबटगोड बोरं खाऊन होतात. फळवाल्यांकडे मिळणाऱ्या मोठ्या बोरांना यांची सर नाही. हि खास गावठी बोरं. गेल्या महिन्यात जळगावला गेले होते तेव्हा मेहरून तालावाकाठची बोरं खायला मिळाली. ही ‘मेहरून’ची बोरं फार प्रसिद्ध. हिरवी खाल्ली तरी गोड. तळ्याकाठची झाडं कुणाच्या मालकीची नाहीत. कुणीही यावं आणि पोटभर बोरं खावीत. अगदी शेतात शेतकऱ्यांनी आवर्जून याचं कलम लावलं असेल तरी हंगामात ते तुम्हांला स्वतः बोरं पाडून देतील. कधी नाही नाही म्हणायचे. खास खानदेशी पाहुणचार.
मेळघाटात जंगलात जिथे जिथे पूर्वी वस्त्या होत्या त्यांच्या आजूबाजूला अजूनही बोरीची झाडं आहेत. अस्वलं हि बोरं खायला हमखास येणार. अस्वलाच्या विष्ठेत या काळात फक्त बोराच्या न पचलेल्या बियांचा खच दिसतो. मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगूळकरांनी याविषयी छान लिहिलं आहे.
रात्री फुलणाऱ्या आपल्या पांढऱ्या सुवासिक फुलांमध्ये हिवाळ्यात फुलण्याचा मान आहे खास कुंदाला. उन्हाळ्यात मोगरा, पावसाळ्यात जाई-जुई, सायली आणि हिवाळ्यात मात्र कुंद. रात्रीच्या फेरफटक्याला बाहेर पडलं कि हमखास एखाद्या बंगल्याच्या आवारातील कुंद आपल्या सुगंधाने हाक देणार आणि मग तो फुलत असेपर्यंत रोज त्या रस्त्याने चक्कर ठरलेलीच.
काल खूप दिवसांनी बारा बंगल्याच्या आवारात गेले होते. हीसुद्धा आमच्या वृक्ष परिचय कार्यक्रमासाठी नेहमीची जागा. सध्या इथले मोह फुललेत. फांद्यांच्या टोकांना गुच्छाने येणारी कळीसारखी निमुळती याची फुलं. चिक्कार वटवाघळं हि फुलं खात होती. इथल्याच रस्त्यावर पिळूक आहे, शेवगा फुललाय. मधल्या गल्लीच्या टोकाला असलेल्या भल्या थोरल्या रेन ट्री वर शेकडो भोरड्यांचा रात्री मुक्काम असतो. संध्याकाळी गेलात तर त्यांचा गलका ऐकू येईल. काटेसावरीच्या फुलांमधला मधुरस प्यायला करड्या डोक्याच्या मैना आणि इतर पक्ष्यांची धावपळ चालू असेल. विलायती चिंच फुलली आहे. दिवसा या फुलांचा गोड वास आसमंतात पसरतो. या भागात जुने, उंच, भला थोरला घेर असलेले प्रचंड वृक्ष अजून टिकून आहेत. यातल्या बऱ्याच वृक्षांवर पक्षी रात्रीच्या निवाऱ्यासाठी येतात. अगदी परदेशी पाहुणे पक्षीसुद्धा. मधल्या गल्लीतल्या रेन ट्री वर बगळे, ढोकरी यांचे वसतीस्थान आहे. याला सरांगागार म्हणतात. ही झाडे आणि हा अधिवास टिकवणं हे शहरवासीय म्हणून आपलं कर्तव्य आहे. बरेचदा अशा जागा सकाळ संध्याकाळ वॉकला येणाऱ्या माणसांसाठीच आहेत असं आपण गृहीत धरतो. पण अशा जागी ज्या नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्याला छान वाटतं, शांतता मिळते ते आपण विसरतो. मग जॉगिंग ट्रॅक, बसायला कट्टे, पायऱ्या, अधिक माणसे यांमुळे तिथले मूळ नैसर्गिक अधिवास धोक्यात येतात. हिरवाई कमी होते. मग त्यावर अवलंबून असणारे प्राणी, पक्षी कमी होतात. जैवविविधता कमी होते. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हा ठेवा राखून ठेवणं हे आपलं कर्तव्य नाही का?
Kommentare