
आता हळूहळू मळभ यायला सुरुवात झाली आहे. येऊरच्या जंगलात सकाळी छान वारा होता. मामा-भाचा डोंगराच्या रस्त्यावर आता साग सोडून बाकी बहुतेक सर्व झाडांना पालवी आली आहे. पोपटी रंगाच्या विविध छटांनी जंगल सजलंय. कुम्भा, काटेसावर यांना नवीन पानं आली आहेत. मोह, कुसुम यांची कोवळी लाल-गुलाबी पालवी आता पोपटी हिरवी झाली आहे. कौशीवर गुलाबी, चकचकीत पानांसारखी फळं लटकतायत. याच्यावर बाहेरच एक किंवा दोन बिया असतात. खूपच वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे हि. वाळलेलं फुल खाली तसंच असतं. कुम्भ्यावर हिरवी चेंडूसारखी फळं लगडली आहेत. हि कुम्भ्याची फळं गवे आवडीने खातात, असं राधानगरी मध्ये गेलं असताना कळलं. वाटेवर करंजाच्या शेंगा आणि बियांचा खच आहे. हुंबच्या झाडाखाली पिकलेल्या कोकमासारख्या दिसणाऱ्या फळांचा खच पडलाय. येऊरमधले आदिवासी हि फळं खातात. मोहाला फळं धरली आहेत. ठाणे- रायगडच्या आदिवासी भागांमध्ये या मोहफळांची भाजी करतात. एअरफोर्स स्टेशनच्या समोरच्या डोंगरावरील जांभळी तर अक्षरशः लगडल्या आहेत. छोट्या, गोड तुरट जांभळांचा खच पडलेला आहे. मनसोक्त जांभळं खाऊन जीभा जांभळ्या करून घ्याव्यात. माकडांच्या टोळ्या यांच्यावर चढून मस्त फन्ना उडवत असतात. माकडे वर असताना खाली सडाच पडतो. पटापट जांभळं वेचता येतात. प्रचंड असे हे जांभळीचे वृक्ष कदाचित फार पूर्वी लावलेले असावेत. कारण यांना खाली बांधलेले पार आहेत. जांभळी भोजनासाठी हे फारच उत्तम ठिकाण आहे. मामा-भाच्याकडच्या जंगलात प्रचंड आंब्याची झाडं आहेत. परंतु ती जंगली आहेत. रस्त्याकडच्या दोन बाजूंच्या जंगलाच्या टप्प्यात झाडांमध्ये बराच फरक आढळतो. येऊरच्या जंगलातला ताडगोळ्यांचा हंगाम एप्रिलमध्ये सुरु होतो. आपल्या जंगलात ताड, भेरली माड आणि शिंदी हे तीनच पामच्या जातीचे वृक्ष आहेत. बाकी शहरात उद्यानात, रस्त्याच्या कडेला किंवा दुभाजकांवर लावलेले पाम हे विदेशी आहेत. ते आपल्या जंगलात आढळत नाहीत. एप्रिल सुरु झाला, कि येऊरचे लोक सकाळीच हे ताडगोळे उतरवून रस्त्यावर विकायला बसतात. आणि मग चालायला येणाऱ्या लोकांना ती एक मेजवानीच असते. ऐन उन्हाळ्यात या रसाळ आणि मधुर फळाची गोडीच वेगळी. ताडगोळ्यांचा हंगाम संपत आला कि मानपाड्याच्या डोंगरात धामणी फळायला लागतात. धामण, फालसा हे भाऊ-भाऊ. परंतु जंगलात फालसाची झाडं खूपच कमी झाली आहेत. त्याची आता लागवड केली जाते. धामणीची झाडं मात्र चिक्कार आहेत. या ऋतूत त्यांच्यावर गुलाबी-लाल रंगाची छोटी जोडफळं लागतात. आत बी असते. थोडी सुकलेली हि काला-खट्टा फ्लेवर असलेली धामणं खायला फार गोड लागतात.

जंगलाचा रखरखीतपणा आता कमी झालाय. त्याच बरोबर कोकीळ, ऑरेंज हेडेड थ्रश, सुभग यांच्या सुरेल तानांमुळे आपली सकाळ अधिकच सुखद होऊन जाते. करवंदीच्या जाळ्या लालसर काळ्या टपोऱ्या फळांनी भरल्या आहेत. बारतोंडीच्या फुलांचा हंगाम अजून चालू असल्यामुळे जंगलभर मंद गोड मोगऱ्यासारखा सुगंध भरून राहिलाय. जंगलात मधेच कोणीतरी गावकरी शेवळं गोळा करताना दिसतात. ही तर या ऋतूतली अगदी खास डेलीकसी. जंगली सुरणाचा हा फुलोरा. पावसाच्या आधी हा फुलोरा येतो, ज्याची आपण भाजी करतो आणि पाऊस सुरु झाला कि याला पानं येतात. शास्त्री नगरच्या बाजारात येऊरच्या बायका कोरल्याची भाजी विकायला घेऊन येतायत. पावसाळ्यातल्या रानभाज्यांपैकी शेवळं मे महिन्याच्या अखेरीस येतात आणि कोरला म्हणजे आपट्यासारखी पानं असणारी भाजीसुद्धा आत्ता झाडांना पालवी फुटते त्या सुमारास येते. अजून वळीवाचा पाऊस बरसला नसल्यामुळे पानकुसुम किंवा क्रायनम लिली फुलायला वेळ आहे. पण आता लक्ष ठेवलं पाहिजे.

जंगलात हिरवा रंग तर शहरात ठिकठिकाणी लावलेले गुलमोहोर फुलायला लागलेत. पेल्टेाफोरमचा सोनपिवळा बहर अजून चालूच आहे. या पिवळ्या-केशरी रंगसंगतीने मजा आणलीये. मूळचा मादागास्कर बेटाचा रहिवासी असणारा हा गुलमोहोर आपल्याकडे ब्रिटिशांनी दोनशे वर्षांपूर्वी आणून लावला. आता त्याच्या मूळ ठिकाणाहून तो जवळजवळ नामशेष झालाय आणि आपल्याकडे मात्र चांगलाच स्थिरावलाय. खेडोपाडी अगदी कितीही अंतर्गत भागांत या ऋतूत फुललेला गुलमोहोर पहिला, कि प्रसन्न वाटतं. या पाहुण्याचं आता हेच घर झालंय.

Comments